योजनेचे पात्रता निकष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२५-२६

स्वाधार योजना २०२५-२६ - संपूर्ण पात्रता माहिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

या पृष्ठावर योजनेच्या पात्रता निकषांची संपूर्ण माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.

पात्र प्रवर्ग

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी

उत्पन्न मर्यादा

पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखापेक्षा कमी

शैक्षणिक योग्यता

इयत्ता ११वी, १२वी व त्यानंतरचे उच्च शिक्षण

कालावधी

जास्तीत जास्त ७ वर्षे (व्यावसायिक - ८ वर्षे)

  • विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा व त्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
  • शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
  • शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांने अर्जामध्ये 'स्वाधार योजनेचा' पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील.
  • विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील (स्थानिक रहीवासी) सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
  • विदयार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. (केंद्र शासनामार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार ही मर्यादा लागू राहील).
  • अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. (उशिरा प्रवेश झालेल्यांसाठी महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत).
  • विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.

  • सदर विद्यार्थी इयत्ता ११वी, १२वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी स्थानिक नसावा.
  • महानगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
  • विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान ५०% गुण (किंवा ग्रेडेशन/CGPA) असणे अनिवार्य आहे.
  • एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
  • इयत्ता १२वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास लाभ घेता येणार नाही.
  • बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील.
  • दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द) विदयार्थ्यांना ३% आरक्षण असेल. (४०% पेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य).
  • दिव्यांग विदयार्थ्यासाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी राहील.
  • विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्याक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • या योजनेसाठी 'खासबाब सवलत' लागू राहणार नाही.

  • एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वर्षे (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८ वर्षे) या योजनेचा लाभ घेता येईल. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.
  • शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी (ATKT) प्राप्त झाली असेल त्या विद्यार्थ्यांला फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल.
  • शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी पात्र असेल, तथापि, हा खंड २ वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • विद्यार्थ्यास (१)शासकीय वसतिगृह, (२)स्वाधार योजना किंवा (३)विद्यावेतन योजना या तीन योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  • विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
  • विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% आवश्यक राहील.
  • सदर योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच (Full Time Course) लागू राहील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. स्वाधार योजनेसाठी मुलभूत पात्रता काय आहे?

विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गाचा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, शासकीय वसतीगृहासाठी पात्र परंतु क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेला, पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

२. कोणत्या वर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत?

इयत्ता ११वी, १२वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणात (पदविका, पदवी, पदव्युत्तर) शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत. मागील वर्षी किमान ५०% गुण (दिव्यांगांसाठी ४०%) असणे आवश्यक.

३. योजनेचा लाभ किती वर्षे घेता येतो?

जास्तीत जास्त ७ वर्षे (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८ वर्षे) या योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षे असावे.

४. पालकांची उत्पन्न मर्यादा काय आहे?

पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या उत्पन्न मर्यादेनुसार ही मर्यादा बदलू शकते.

५. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद आहे का?

होय. दिव्यांग विद्यार्थ्यांना ३% आरक्षण आहे. ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची मर्यादा ४०% आहे.

६. अर्ज भरण्याची अंतिम तारीख कधी आहे?

प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येतो. उशिरा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज करावा.

७. एकाच वेळी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही?

शासकीय वसतिगृह, स्वाधार योजना किंवा विद्यावेतन योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येतो. एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नाही.

८. उपस्थितीची किमान टक्केवारी किती असावी?

विद्यार्थ्याची महाविद्यालयातील किमान ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.

९. अर्ज नाकारण्याची कारणे कोणती असू शकतात?

चुकीची माहिती देणे, आवश्यक कागदपत्रे जमा न करणे, पात्रता पूर्ण न करणे, मुदतीनंतर अर्ज करणे, उपस्थिती कमी असणे यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.

१०. अधिक माहितीसाठी कोठे संपर्क करावा?

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे संपर्क साधा. दूरध्वनी: 02452-220595, ईमेल: acswoparbhani@gmail.com